मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीने (ED) टाच आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीकडून संजय राऊत यांचे अलिबागमधील 8 प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे.  


प्रवीण राऊत (Pravin Raut) पत्राचाळ घोटाळ्याचं (Patrachawl Scam) जे प्रकरण होतं, त्या घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. याच प्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्या अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे. 


प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती आणि आता ते न्यायालयीन कोठडीत आहेत. पत्राचाळ घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप असून हा सर्व घोटाळा १ हजार ३४ कोटी रुपयांचा आहे.  पत्राचाळ घोट्याळ्यातील पैशाचा वापर अलिबागमधल्या जमिनी खरेदीमध्ये करण्यात आला होता, असं प्रवीण राऊत यांच्या चौकशीतून समोर आलं होतं. 


या जमिनीची खरेदी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावावर करण्यात आल्या होत्या. साठ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा हा व्यवहार होता. 


अतिशय कमी दरात आणि मुळ जमीन मालकांना धमकावून या जमिनी घेण्यात आल्या होत्या असं ईडीच्या चार्जशिटमध्ये नमुद करण्यात आलं आहे.