Covid Center Scam :  मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOS) काही दिवसांपूर्वीच किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता ईडीनेही (ED) किशोरी पेडणेकर यांच्याशी संबधित दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादीच मागवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता ईडीकडूनही किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मनी लॉंडरिंगचा (Money laundering) गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकरांविरोधात 50 लाखांच्या बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता या गुन्ह्याची माहिती ईडीने मागवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे. कोविड काळात बॉडीबॅगच्या खरेदीमध्ये 50 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. ईडीने याबाबत माहिती मागवली आहे. त्यामुळे आता किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


काय आहे घोटाळा?


ईडीने मुंबईतील कथित कोविड घोटाळ्यावरून काही दिवसांपूर्वी विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली होती. कोविड काळात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. कोरोना काळात औषधांच्या खरेदी वाढीव दरात करुन बॉडी बॅगच्या खरेदीतही घोटाळा झाल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं होतं. दोन हजार रुपये किमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना खरेदी केल्याचे ईडीने सांगितले होते. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरूनच हे कंत्राट देण्यात आलं होतं, असा दावा केला जात आहे. महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचा आक्षेप डावलून हे कंत्राट देण्यात आल्याचाही आरोपही करण्यात आला होता.