`लाव रे तो व्हीडिओ`मुळेच राज ठाकरेंची `ईडी`कडून चौकशी- धनंजय मुंडे
`लाव रे तो व्हीडिओ`च्या माध्यमातून त्यांनी मोदी-शहांचं पितळ उघडं पाडलं.
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी सरकारविरोधात केलेल्या तुफान प्रचारामुळेच त्यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) चौकशी केली जात आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. हिंगोली येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
कोहिनूर स्क्वेअर गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी राज ठाकरे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचले. गेल्या काही तासांपासून राज यांची चौकशी सुरु आहे.
यादरम्यान, विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी राज यांना पाठिंबा दर्शवला आहे. धनंजय मुंडे यांनीदेखील राज यांची पाठराखण करताना म्हटले की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला. त्याच राज ठाकरेंनी २०१९ मध्ये आपली भूमिका बदलली. यानंतर प्रचारादरम्यानच्या 'लाव रे तो व्हीडिओ'च्या माध्यमातून त्यांनी मोदी-शहांचं पितळ उघडं पाडलं. ही गोष्ट सहन न झाल्यामुळे राज ठाकरे यांच्याविरुद्ध ईडीची चौकशी लावण्यात आली, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
लोकशाहीचा गळा आवळणारे लोक सध्या सत्तेत आहेत. त्यामुळेच अशाप्रकारच्या गोष्टी घडत असल्याचेही यावेळी मुंडेंनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही राज ठाकरे यांच्या चौकशीचा निषेध केला आहे. राज ठाकरे आणि पी. चिदंबरम यांची चौकशी म्हणजे एक राजकीय दबावतंत्र आहे. निवडणुकांच्या तोंडावर जाणुनबूजून सरकारकडून हा स्टंट केला जातोय. जेणेकरून ईडीच्या दबावामुळे सर्व नेते शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करतील, असा आरोप आव्हाड यांनी केला.