जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वाढदिवशी, अमळनेर भाजपचे कार्यकर्ते समाधान धनगर यांनी नाथाभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी, फेसबूकवर १९९५ साली काढलेला हा फोटो आता शेअर केला, आणि हा फोटो पाहून भाजपचे जुने कार्यकर्ते भावूक झाले, कारण हा फोटो खूप काही बोलतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत एकनाथ खडसे यांच्या पाठीशी लालदिव्याची गाडी दिसतेय आणि सोबत २२ वर्षापूर्वीचे कार्यकर्ते, आजही नाथाभाऊंची ही आठवण, समाधान धनगर यांच्यासारखे कार्य़कर्ते जपतात.


ज्यांनी ऐन तारूण्यात भाजप पक्ष बांधणीसाठी मेहनत घेतली. पक्ष गावागावात पोहोचवला. ते हे कार्यकर्ते आहेत. असे हे कार्यकर्ते, नाथाभाऊंच्या पाठीशी तेव्हाही होते, आताही आहेत, मात्र ती मंत्रिपदाची गाडी आज नाथाभाऊंना चकवा देऊन गेली, असंच या फोटोत दिसतंय.


नाथाभाऊंची ही अवस्था विरोधीपक्ष नेते असतानाही नव्हती, ती आता भाजप सत्तेत असताना आहे, अर्थात कार्यकर्त्यांना हे अस्वस्थ करणारं आहे. मात्र यात सर्वात समाधानाची बाब म्हणजे, कार्यकर्ता नावाचं धन नाथाभाऊंनी जोपासलं आहे, ते आजही मनाने त्यांच्यासोबत असल्याचं हा फोटो सांगतोय.


पुढाऱ्यांसाठी कितीही पदे आली आणि गेली, तरी कार्यकर्ते त्यांच्यासोबत सतत असले पाहिजेत. ते नसले तर त्या नेत्याचं राजकारण संपलंय, असा संदेश जनतेत जातो. नाथाभाऊंचा अजून तरी तसा संदेश गेलेला नाही, हेच या फोटोंवरून लक्षात येतं.