दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भाजपा-शिवसेना सरकारच्या काळातील शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत एकनाथ खडसे भावनिक झाले. त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ही सल अजूनही खडसेंच्या मनात आहे. वारंवार त्यांनी ही सल बोलूनही दाखवली आहे. आजही ही सल बोलून दाखवताना खडसे भावनिक झाले होते. तसंच आपल्यावरील आरोपांचे स्पष्टीकरण देताना खडसेंनी आपल्याच सरकारला शालजोडे लगावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्या जीवनात मी एकही निवडणूक हरलो नाही. 40 वर्षात आपल्यावरील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आरोप - प्रत्यारोप सभागृहात होत राहणार, मात्र पण विरोधी पक्षनेता म्हणून मी कायम पुराव्यांसह आरोप केले आहेत. कारण बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात, हे मला माहिती असल्याचे खडसे यांनी आपल्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण देताना सांगितले.


288 आमदारांपैकी सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून मी आज इथे उभा असल्याचे खडसे उद्वगाने विधानसभेत म्हणाले. सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांपैकी कोणीही माझ्यावर आरोप केले नाहीत. बाहेरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले. 


दाऊदच्या बायकोशी माझे बोलण्याची संबंध जोडले गेले. दाऊदला सोडून तिला नाथाभाऊशी का बोलावं वाटलं हे मला कळलंच नाही. एटीएस आणि इतर यंत्रणांनी केलेल्या चौकशीत काहीच सिद्ध झालं नाही, त्यामुळे मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही बरं वाटलं, असं उपरोधकपणे खडसे विधानसभेत म्हणाले.


एकही इंच जमीन घेतली नसताना, सर्व नियमांचं पालन केलेले असतानाही माजी न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती नेमली गेली. अँटी करप्शन विभागाकडून दोनदा चौकशी झाली, इन्कम टॅक्सची घरी धाड पडली. 


माझ्या बायका, पोरांना चौकशीसाठी नेण्यात आलं. मी जमीनदाराचा मुलगा आहे. माझ्या शेतीव्यतिरिक्त माझा एकही उद्योग नाही. संपूर्ण मालमत्तेची चौकशी करून अपसंपदा आढळली नाही. माझी एकही शैक्षणिक संस्था नाही कारण माझ्यात डोनेशन घेण्याचा दमच नव्हता, असे खडसे याबाबत बोलताना म्हणाले.


मी शेवटच्या दिवशी उभा आहे कारण भ्रष्ट, नालायक, चोर, उच्चका सदस्य असा शिक्का घेऊन मला या सभागृहातून जायचं नाही, म्हणून मी हे बोलतोय. मी सभागृहाला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की हा डाग मला घेऊन जायची संधी देऊ नका, अशी भावनिक विनंती खडसे यांनी यावेळी बोलताना केली.


खोटे आरोप करणाऱ्यांना शिक्षा करण्याचा कायदा करा, अशी मागणी करत विनापुरावे आरोप झालेला व्यक्ती आज घरी आहे, काय न्याय आहे या राज्यात? असा सवाल त्यांनी करत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांकडे बोट केलं.


कोणाच्या जीवनात असा प्रसंग येऊ नये, यापेक्षा वाईट आपल्या जीवनात काही होऊ शकेल असे वाटत नाही, असे सांगत काही चुकीचं बोललो असेल तर सर्वांची क्षमा मागतो, असं सांगत खडसेंनी आपल्या भाषणाची सांगता केली.