दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय. सरकारकडे माहिती मागितली तरी मिळत नसल्याचं खडसेंचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अधिवेशनात खडसेंनी काही प्रकरणांची माहिती मागितली होती. माहिती देण्याची तयारीही सरकारनं दाखवली. पण अद्याप ही माहिती मिळालेली नाही, असे विधानसभेत निदर्शनाला आणले. 


जी माहिती मागितली, त्याप्रकरणात घोटाळा आहे, म्हणूनच ही माहिती लपवली जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यानंतर विरोधकांनीही सरकारला चांगलेच धारेवर धरले. पारदर्शकपणा कुठे आहे, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. 


एकनाथ खडसे काय म्हणाले?
“राज्यभरातील जमीन संपादित करण्यासाठी सरकारने नोटिफिकेशन काढलं. हजारो एकर जमिनी शेतकऱ्यांच्या घेतल्या. परंतु त्या मोकळ्या केल्या. अशी मोकळे केलेले किती भूखंड आहेत हे मी सभागृहात विचारतोय. पण ते देऊ शकत नाहीत. मला ही माहिती सभागृहात सहा सहा महिने मिळत नाही.


मला विनंती आहे की, आपल्या माध्यमातून ही माहिती मला पुढच्या आठवड्यात मंगळवार-बुधवारी मिळेल का? नाहीतर हे पण अधिवेशन गेलं. एक एक वर्ष भांडून भांडून मिळत नसेल तर माहिती शासन का दडवतंय? काय लपवतंय? काय असं आहे की ते मला माहिती देऊ शकत नाहीत? त्या प्रकरणात घोटाळे झाल्याची शंका असल्यामुळे ही माहिती सभागृहात येत नाही, असा माझा आरोप आहे.”