मुंबई: एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी असतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेनंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. ठाणे जिल्ह्यातून राज्याला पहिला मुख्यमंत्री मिळाला आहे. एकनाथ शिंदे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री असणार आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी आल्याने ठाण्यात एकच जल्लोष करण्यात आला. ठाण्यात शिंदे समर्थकांनी ठिकाणीठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा केला. विधानभवनाबाहेर शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर गोव्यात असलेल्या बंडखोर आमदारांनी नाचत आनंद साजरा केला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



एकनाथ शिंदे (58) यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला आणि त्यांचे बालपण गरिबीत गेले. ते 16 वर्षांचे असताना त्यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी बराच काळ ऑटो रिक्षाही चालवली. याशिवाय पैसे मिळवण्यासाठी त्यांनी दारूच्या कारखान्यात काम केलं. 


एकनाथ शिंदे यांच्यावर बाळसाहेब ठाकरे यांचा खूप प्रभाव होता आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना प्रवेश केला. त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांपर्यंत पोहोचणारा महाराष्ट्रात शिवसेना हा एकमेव पक्ष होता.


1980 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 1970-80 च्या दशकातील महाराष्ट्रातील इतर तरुणांप्रमाणेच एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा प्रभाव होता. 1980 च्या दशकात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि किसन नगरचे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून ते सामाजिक आणि राजकीय विषयांवर पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये आघाडीवर होते.


2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत  


1997 मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नगरसेवकपदाचे तिकीट दिले आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 2001 मध्ये त्यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतेपदी निवड झाली आणि 2004 पर्यंत ते या पदावर राहिले. 2004 मध्ये एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 


2014 मध्ये विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले


एकनाथ शिंदे यांची 2005 साली शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. 2014 च्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.


एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेशी संबंधित असून ते सध्या ठाण्यातील पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 4 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे.