धनुष्य बाण` कुणाचा? शिवसेनेसोबत धनुष्य बाणावरही शिंदे गटाचा दावा?
एकनाथ शिंदे यांचा 40 पेक्षा अधिक आमदार फोडून बंडाचा झेंडा
Maharashtra Political Crisis : हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे...अशी अवस्था सध्या सत्ताधारी शिवसेनेची (Shivsena) झाली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी 40 पेक्षा अधिक आमदार फोडून बंडाचा झेंडा फडकवला आहे. जवळपास दोन तृतीयांश आमदार शिंदेंसोबत असल्यानं त्यांनी पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. (Eknath Shinde group claim on party symbol )
तर मुख्यमंत्रीपदासह शिवसेना पक्षप्रमुखपदावरही पाणी सोडावं लागतं की काय, अशी वेळ उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) आलीय. त्यांची अवस्था थेट हृदयात बाण घुसल्यासारखी झाली आहे.
गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये दररोज सकाळी संध्याकाळी शिवसेना आमदारांसह शिंदेंचं शक्तिप्रदर्शन सुरू आहे. शिंदेंकडे 40 हून अधिक आमदारांचं संख्याबळ असल्यानं शिवसेना पक्षावरच दावा ठोकण्याची तयारी त्यांनी सुरू केलीय. आपला गट हीच खरी शिवसेना आहे, असा दावा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून लवकरच करणार आहेत. एवढंच नव्हे तर 'धनुष्य बाण' हे शिवसेनेचं अधिकृत पक्षचिन्ह मिळवण्यासाठी शिंदे कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेचा 'धनुष्य बाण' कुणाचा?
पक्षातून दोन तृतीयांश आमदार फुटून बाहेर पडले, तर ते अपात्र ठरत नाहीत. मात्र मूळ पक्षावर दावा करण्यासाठी मूळ पक्षातही फूट पडायला हवी. लोकप्रतिनिधींसह पक्ष पदाधिकारी देखील फूट पडून पक्षाबाहेर पडायला हवेत. शिवाय कोणत्याही गटाला पक्ष म्हणून मान्यता देण्याचे सर्वाधिकार निवडणूक आयोगाला आहेत. निवडणूक चिन्ह देण्याचे अधिकारही निवडणूक आयोगालाच आहेत, अशी माहिती घटनातज्ज्ञ देतात
मात्र त्यासाठीची लढाई कोर्टात देखील लढावी लागेल, असंही घटनातज्ज्ञ सांगतात
याचाच अर्थ शिवसेनेचे आमदार फुटल्यानं उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलंय. परिणामी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गडगडू शकतं. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकते. मात्र मूळ शिवसेना पक्षावर आणि धनुष्य बाणावर दावा करण्यासाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढाई अटळ आहे.