मुंबईत शिंदे गटाच्या पहिल्या शाखेची एन्ट्री, उद्धव ठाकरे गटाला शह
ठाकरे गटाला शह देण्यासाठी शिंदे गट आक्रमक, मुंबईत शिंदे गटाची पहिली शाखा
Maharashtra Politics : सत्ता संघर्ष झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) बनले. आता एकनाथ शिंदे हे आपला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाचं स्वतंत्र सेनाभवन निर्माण करण्यात येणार असतानाच आता शिवसेनेची (Shivsena) शिंदे गटाची पहिली शाखा मुंबईच्या एन्ट्री गेटवर मानखुर्द (Mankhurd) इथं सुरू झाली आहे.
खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी ही शाखा सुरू केलीय. 143 शिवेसेना शाखा असं नाव देण्यात आलं असून शाखेच्या फलकावर पतंप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
बाळासाहेबांचा विचार विसरून 100 टक्के राजकारण होत होते, शिवसेना शाखा न राहता महाविकास आघाडीचं कार्यालय झालं होतं, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बसायला सुरवात झाली होती अशी टीका राहुल शेवाळे यांनी केली आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाची शाखा सुरु केल्याचंही शेवाळे यांनी सांगितलं.
शिवसेना आणि शिवसैनिक यांचे शिवसेना शाखेशी त्यांचं नातं जोडलेलं असतं. मात्र आता शिंदे गट प्रत्येक ठिकाणी शिवसेना शाखा उघडून उद्धव गटाला शह देण्याच्या तयारीत दिसत आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू असताना शिंदे गट स्थानिक शाखा वाढवत आहे हे ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरणार आहे.