दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये होऊ घातलेल्या 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, नागपूर अशा मोठ्या महापालिकांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे आहे कारण
राज्यातील 10 महापालिकांची मुदत फेब्रुवारी 2022 आणि 25 जिल्हा परिषदांची मुदत मार्च 2022 मध्ये संपत आहे. राज्य सरकारने राज्यातील महापालिकांच्या प्रभागांची आणि जिल्हा परिषदांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदांच्या सदस्य संख्या वाढीसाठी राज्य सरकार 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अध्यादेश आणणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या गटांची फेररचनेची प्रक्रिया त्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे त्यासाठी आणखी विलंब लागण्याची चिन्हं आहेत.


सदस्य संख्या वाढणार असल्याने राज्यातील सर्व महापालिकेत प्रभागांची आणि जिल्हा परिषदेत गटांची फेररचना यामुळे करावी लागणार आहे. ही सगळी प्रक्रिया पार पडायला उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2022 मध्ये होऊ घातलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांची निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हं  आहेत.


फेब्रुवारीमध्ये मुदत संपणाऱ्या 10 महानगरपालिकांमध्ये मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर या बड्या महापालिकांचा समावेश आहे.


मार्च 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 25 जिल्हा परिषदांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा परिषदांचा समावेश आहे.


आधीच राज्यातील औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, आणि कोल्हापूर या महानगरपालिकांची निवडणूक कोरोनामुळे प्रदीर्घ काळ रखडल्या आहेत. त्यात फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकाही पुढे जाण्याची चिन्हं आहेत.