वाढीव वीज बिल : उद्रेक झाला तर सरकार जबाबदार, मनसेचा सोमवारपर्यंत अल्टिमेटम
राज्यातील जनता वाढीव वीजबिलाबाबत (Electricity Bill) त्रस्त आहे. राज्य सरकारने सोमवारपर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा प्रचंड मोर्चा काढू आणि जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेने (MNS) दिला आहे.
मुंबई : राज्यातील जनता वाढीव वीजबिलाबाबत (Electricity Bill) त्रस्त आहे. राज्य सरकारने सोमवारपर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा प्रचंड मोर्चा काढू आणि जशास तसे उत्तर दिले जाईल. तसेच त्यानंतर जे काही घडेल त्याची जबाबदारी राज्य सरकारची (Maharashtra Government) असेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मनसे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे.
वाढीव विजबिलाच्या मुद्द्यावर मनसेची सरकारला घेरण्याची तयारी सुरु झाली आहे. मनसेचे नेते मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला इशारा देताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप केला. सोमवारपर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसे मोर्चा काढणार आहोत. तसेच कोणी मिटर कापायला आले तर आमचे महाराष्ट्र सैनिक उभे राहतील. त्यानंतर जे काही घडेल त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, अशा स्पष्ट शब्दात इशारा दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला. मात्र, पवार यांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत नाही असेच दिसत आहे. कोणाच्या काळात काय झाले ते आम्हाला नको. तुम्ही शब्द दिलात ना, मग आता माघार कशाला? राज्य तुमचे आहे. तुम्ही कर्ज काढा आणि सामान्य जनतेला दिलासा द्या, एवढीच आमची मागणी आहे. यात कोणतेही राजकारण नका. जनता भरडली जाता कामा नये, हीच अपेक्षा आहे, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.