मुंबई : एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असतानाच आता महाराष्ट्रातल्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे. महावितरणनं राज्यातल्या घरगुती आणि कृषीपंप धारक शेतकऱ्यांच्या वीज दरवाढीचा निर्णय घेतला आहे. घरगुती वीज दरामध्ये ५ टक्के वाढ झाली आहे तर कृषीपंपाच्या दरात २० पैशांची वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतीसाठी देण्यात येणाऱ्या विजेचे दर सध्या ३.३५ रुपये प्रती युनिट आहेत. हे दर आता ३.५५ रुपये प्रती युनिट करण्यात आले आहेत. तर घरगुती विजेचा दर सध्या १०० युनिटपर्यंत ५.०७ रुपये प्रती युनिट आहे आणि ३०० युनिटपर्यंतचा दर ८.७४ रुपये प्रती युनिट आहे.  आता हा दर १०० युनिटपर्यंत ५.३१ प्रती युनिट आणि ३०० युनिटपर्यंत ८.९५ रुपये प्रती युनिट झाला आहे.


एकीकडे राज्यात वीज दरवाढीचा निर्णय झाला असला तरी मुंबईत बेस्टच्या वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बेस्टनं वीज दरात ६ ते ८ टक्के कपात केली आहे. मुंबईतल्या अदानी आणि टाटाच्या वीज दरात १ टक्क्याची वाढ झाली आहे.