एलफिन्स्टन चेंंगराचेंगरी मागील हे सत्य, प्रत्यक्षदर्शीचा जबाब
एलफिन्स्टन-परळ पूलावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि अफवा जबाबदार होती.
मुंबई : एलफिन्स्टन-परळ पूलावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि अफवा जबाबदार होती. एलफिन्स्टन-परळची भीषण दुर्घटना गैरसमजूतीमधून घडल्याचं या दुर्घटनेत बचावलेल्या शिल्पा विश्वकर्मा या विद्यार्थिनीनं सांगितलं आहे.
प्रचंड गर्दीत भारा वाहणा-या व्यक्तीकडील फुलं पडली. त्यावेळी फूल गिर गया अशी ओरड सुरु झाली. त्यावेळी लोकांना पूल गिर गया असा समज झाला. त्यामुळे ही घटना घडली असं शिल्पाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय. उच्चार साधर्म्यामुळेच चेंगराचेंगरीची ही घटना घडल्याचं तिनं सांगितलंय.
एलफिन्स्टन इथं राहणारी शिल्पा इंजीनिअरिंगच्या तयारीसाठी विलेपार्ले इथं क्लासला जाते. 29 सप्टेंबरच्या सकाळी पावसामुळे एलफिन्स्टन-परळ पूलावर प्रचंड गर्दी झाली होती. त्याचवेळी फूलाचा भारा वाहून नेत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरुन फुलं खाली पडू लागली. यावेळी झालेल्या गोंधळानंतरच ही घटना घडल्याचं शिल्पानं म्हटलंय.
एलफिन्स्टन-परळ या दुर्घटनेमध्ये सुमारे 23 लोकांचा बळी गेला तर 40 हून अधिक लोकं गंभीर जखमी झाले आहेत.