गुंडांचा कर्दनकाळ एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचं कमबॅक
प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा पोलीस सेवेत रुजू झाले आहेत. सध्या ते पोलीस महासंचालक मुख्यालयात पदभार स्विकारतील. काही दिवसानंतर त्यांची ठाण्यात बदली केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा पोलीस सेवेत रुजू झाले आहेत. सध्या ते पोलीस महासंचालक मुख्यालयात पदभार स्विकारतील. काही दिवसानंतर त्यांची ठाण्यात बदली केली जाण्याची शक्यता आहे.
एका बनावट एन्काउंटर प्रकरणात त्यांना २००८ मध्ये निलंबितही करण्यात आले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आणि डी. कंपनीच्या इशाऱ्यावर एन्काउंटर करत असल्याचा शर्मा यांच्यावर आरोप झाला होता.
गुंडांचा कर्दनकाळ समजले जाणारे प्रदीप शर्मा यांनी आजवर ३१२ एन्काउंटरमध्ये भाग घेतला असून त्यांनी १०० हून अधिक गुंडांचे एन्काउंटर केले आहे. २००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या एन्काउंटरची चौकशी करण्यात आली होती. हे एन्काउंटर बनावट असल्याचं उघड झालं होतं.
याप्रकरणी मुंबई पोलिसातील १३ अधिकारी आणि पोलिसांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्मांचाही समावेश होता. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. शर्मा हे १९८३ च्या बॅचचे अधिकारी असून २०२० मध्ये ते निवृत्त होणार आहेत. त्यांची ठाणे जिल्ह्यात बदली होण्याची शक्यता आहे.