मुंबई : उशीरा लागलेल्या निकालाचा मुंबई विद्यापीठाचा गोंधळ संपतो ना संपताच आता नवा गोंधळ सुरू झाला आहे. परीक्षा काही तासांवर आली असतानाही विद्यार्थ्यांना अद्याप हॉलतिकीटच न मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाची चांगलीच गोची झाली आहे.


उशीरा निकाल लागल्याने विद्यापीठाचे कुलगूरु डॉ. संजय देशमुख हे सक्तीच्या रजेवर आहेत. तरीही विद्यापीठ यंत्रणनेने यातून काही धडा घेतलेला दिसत नाही.  आज गुरुवारपासून विद्यार्थ्यांची‘एटीकेटी’ची परीक्षा सुरू होत आहे. तसेच प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या काही परीक्षा आज, ५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत.  यासाठी बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांना याआधीच हॉलतिकीट मिळणे अपेक्षित होते. पण आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी रात्रीपर्यंतही हॉलतिकिटे मिळाली नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे परीक्षेसाठी प्रवेश मिळणार का याची काळजी विद्यार्थ्यांना लागली आहे.गेल्या दोन दिवसांपासून ​विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या हॉलतिकिटांसाठी कॉलेजात धाव घेतली होती. पण कॉलेजमधूनही त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. हॉलतिकीट अद्याप वेबसाइटवर उपलब्ध नसल्याची तक्रार विद्यार्थी आणि कॉलेजांकडून करण्यात आल्याचे विद्यार्थी संघटनांनी सांगितले.