कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : मुंबईत रस्त्यांकडील गटारी, छोट्या नाल्यांच्या साफसफाईत कंत्राटदारांनी १०० कोटी रुपयांची हातसफाई कशी करून घेतली, याचे आणखी काही पुरावे आम्ही देणार आहोत. नियम धाब्यावर बसवून पालिका कर्मचारी कंत्राटदारांची बिलं कशी काढतात, पाहा 'झी २४ तास'चा हा आणखीन एक EXCLUSIVE रिपोर्ट...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेनं गटारी, नाल्यातल्या गाळ वाहतुकीसाठी निविदा मागवली, तेव्हा त्यामध्ये महत्वाची अट होती ती म्हणजे सर्व गाड्यांना व्हेईकल ट्रँकिंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे व्हीटीएमएस लावण्याची... VTMS रिपोर्ट असल्याशिवाय बिल अदा केली जाणार नाहीत, असं महापालिकेनं निविदेमध्येच स्पष्ट केलं होतं.


मात्र घनकचरा व्यवस्थापन खात्यातल्या अनेक अधिकाऱ्यांनी हा नियमच खुंटीला टांगला... VTMS शिवाय कंत्राटदारांची बिले मंजूर केली. धक्कादायक बाब म्हणजे, एल विभागाचे सहाय्यक अभियंता जोगदंड यांनी तर या कामासाठी VTMS ची गरज नसल्याचं लिहून दिलंय.


एच पश्चिम येथील गाळ वाहतुकीचं कंत्राट मिळालेल्या 'अंशुमन अँड कंपनी'नं बिलासाठी चक्क कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांचं VTMS जोडलं. त्यांनी जोडलेल्या VTMS वर नजर टाकली तर चारही गाड्या रोज देवनार, गोराई आणि मुलुंड कचरा डेपोवर जात असल्याचं दिसून येतं. मुंबईतला गाळ ठाणे जिल्ह्यातल्या गोटवली इथं टाकला जात असताना यापैंकी एकही गाडी महिन्यातून एकदाही मुंबईबाहेर गेली नाही. तरी त्यांची बिलं बिनदिक्कत मंजूर झाली.


'अंशुमन अँड कंपनी'ला २०१४-१६ च्या कंत्राटामध्ये निविदेतील मंजूर रकमेपेक्षा अडीच कोटी रुपयांची जादा रक्कम वॉर्ड स्तरावरून देण्यात आली. तीदेखील स्थायी समिती किंवा महापालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय... याबाबत कारवाई होणं सोडा, गेली तीन वर्षं केवळ चौकशीचे गुऱ्हाळ सुरू आहे.


भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांना वाचवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी केलाय. दरम्यान, याआधी काय झालं याची माहिती नाही. परंतु आता VTMS असल्याशिवाय बिलं काढलीच जात नाहीत. या कामात अधिक पारदर्शकता आणल्याचा दावा अतिरिक्त पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केलाय.


नियमानुसार गाळ वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा रंग लाल असला पाहिजे, परंतु तसं केलं तर कंत्राटदारांना एकमेकांच्या गाड्या वापरण्यात अडचणी झाल्या असत्या. त्यामुळं नियम कागदावर ठेवून पालिका अधिकारी कंत्राटदारारांना मदत करण्यात धन्यता मानतात, हे विशेष...