मुंबई : मुंबापुरीची तुंबापुरी झाल्यावर चर्चा झाली नाही तरच नवल. पाऊस सुरू असताना काल (मंगळवार) समाधी अवस्थेत गेलेल्या राजकारण्यांनी आज (बुधवार)  एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरू केली आहे. या सर्वात शहर व्यवस्थापनाचे मात्र तिन तेरा वाजले. दरम्यान, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मात्र अभ्यासू मते व्यक्त केली आसून, राजकाण्यांना चांगलेच झोडपले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहर व्यवस्थापनाच्या अभ्यासक आणि गेली अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुलक्षणा महाजन यांनी शहर विकास आणि शहर व्यवस्थापन याबाबत राजकारण्यांचा मुळीच अभ्यास नाही. अभ्यास नसताना या लोकांनी निर्णय घेतल्यामुळे मुंबई तुंबल्याचे म्हटले आहे. साधारण एक दशकापूर्वी मुंबईबाबत थोडातरी व्यवस्थापन रुपात अभ्यास झाला. मात्र, त्यानंतर मुंबई जी अवाढव्य वाढत गेली, त्याचे कोणत्याही प्रकारचे नियोजन झाले नाही. शहरात घरे बांधताना कंटूर मॅपिंग करावे लागते. मात्र, तेवढी तसदी न घेता बिल्डर, लोक घरे बांधतात. अशा वेळी जमिनीच्या पातळीचा विचार केला नाही, त्यामुळे पाणी साचण्याचे व रस्ते तुंबण्याचे प्रकार घडतात. नागरी नियोजनातील भयानक चुका, राजकारणी लोकांची अल्पदृष्टी यामुळे असे तडाखे बसतच राहणार, अशी खंतही महाजन यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, बारा वर्षापूर्वी (२६ जुलै २००५ ) मुंबईत घडलेल्या घटनेतून सरकार आणि प्रशासनाने काय धडा घेतला हे काल दिसले. निवडणुका आल्या की हे करू, ते करू अशी भाषणे होत राहतील. पण, जमिनीवर प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही. असे असले तरी लोकांमध्ये मात्र एक मोठा फरक जाणवला. तो म्हणजे कोणावरही विसंबून न राहता लोकांनी सोशल मीडियाचा आधार घेत एकमेकांना आधार दिला. ज्यांची कुणाची गैरसोय होत असेल त्यांनी आपल्याकडे यावे असे सोशल मीडियावर संदेश येत होते. यातून लोकांची तळमळ कळली. गुरुद्वारा, मंदिरं, मशिदी, विद्यालयं यांनी कसलाही मागचापुढचा विचार न करता लोकांना आश्रय दिला, जेवू खाऊ घातलं, हा लोकांच्या मनाचा मोठेपणा आहे, अशी भावना सुप्रसिद्ध अॅडगुरू, अभिनेते, दिग्दर्शक भरत दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे.