Extortion Case Against MNS Party Leader: लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपण महाराष्ट्रातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पालघरचे मनसे लोकसभा निवडणूक समन्वयक तसेच पक्षाचे नेते अविनाश जाधवांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात हा गुन्हा दाखल झाल्याने याचा फटका अविनाश जाधवांबरोबरच पक्षाला बसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


5 कोटींची खंडणी आणि मारहाण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अविनाश जाधव यांच्याविरोधात मुंबईमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश जाधव यांच्याबरोबरच वैभव ठक्कर यांच्याविरोधात 5 कोटींची खंडणी आणि मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमध्ये एलटी मार्ग पोलीस स्टेशनमधील खंडणी विभागामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये खंडणी, मारहणीबरोबरच कट चल्याचाही ठपका जाधव यांच्यासहीत इतर आरोपींवर ठेवण्यात आला आहे. ठक्कर, अविनाश जाधव यांच्याबरोबर आणखीन 5 ते 6 जणांचा या आरोपपत्रामध्ये उल्लेख असल्याची माहिती समोर येत असून या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तपशील तपासून पाहणार


जैन यांच्या मालकीच्या सोन्याच्या दुकानात एक व्यवहार होता. हा व्यवहार करण्यासाठी हे लोक गेलेले असताना हा धमकावण्याचा आणि खंडणी मागण्याचा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या प्रकरणातील प्राथमिक माहिती हाती आली असून पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर रकॉर्डींगचा तपास पोलीस करत आहेत. 


कोण आहेत अविनाश जाधव?


अविनाश जाधव हे मनसेचे ठाण्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. आंदोलने असो किंवा कार्यक्रम असो अविनाश जाधव हे कायम वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून बातम्यांमध्ये चर्चेत असतात. मनसेने मध्यंतरी काही निष्ठावान कार्यकर्त्यांना नेतेपद बहाल केली होती. त्यामध्ये अविनाश जाधव यांचाही समावेश आहे. मागील अनेक वर्षांपासून ते ठाण्यामध्ये मनसेचं नेतृत्व करतात. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर पालघर जिल्ह्यातील समन्वयकपदाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. अविनाश जाधव हे मनसेचा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील चेहरा म्हणून ओळखले जातात. तसेच ते राज ठाकरेंचेही निकटवर्तीय आहेत. संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर यांच्याबरोबरीने मागील अनेक वर्षांपासून ते मनसेमध्ये सक्रीयपणे कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अद्याप पक्षाने अधिकृत प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.