फडणवीस सरकारची बळीराजा चेतना अभियान योजना महाविकासआघाडी सरकारकडून बंद
फडणवीस सरकारच्या काळातील आणखी एक निर्णय महाविकासआघाडी सरकारकडून रद्द
दीपक भातुसे, मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील आणखी एक निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. बळीराजा चेतना अभियान योजना बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी फडणवीस सरकारने ही योजना सुरु केली होती. विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू होती.
शेतकरी आत्महत्या रोखण्यात योजना अयशस्वी ठरल्याने आघाडी सरकारने योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये फडणवीस सरकारने बळीराजा चेतना अभियान योजना तयार केली होती. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यात ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यास सुरुवातही झाली होती.
बळीराजा चेतना योजनेवर उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी ४८ कोटी आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचा शोध घेणे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण करणे, सामुहिक विवाहांना मदत करणे, पथनाट्य, चित्रपट या मार्गाने शेतकऱ्यांचे मनोबल वाढवणे आणि शेतकर्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे असे या योजनेचे स्वरुप होते.
फडणवीस सरकारच्या काळात २०१५ ते २०१८ या तीन वर्षात १४,९८९ शेतकरी आत्महत्या झाल्या. महाविकास आघाडी सरकारने या योजनेचा आढावा घेतला असता या दोन जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नसल्याचे समोर आले. त्यामुळे या सरकारने ही योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.