मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण अजून नियंत्रणात आलेलं नाही. दुसरीकडे मुंबईत मात्र कोरोना रुग्णांची वाढीचं प्रमाण कमी झालं आहे. राज्यात होणारी वाढ कायम असताना तुलनेत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मुंबईतील चाचण्या वाढवा अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे. मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के आहे. मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन चाचण्यांची संख्या 6574 होती, ती 7709 वर गेली. ही वाढ केवळ 14 टक्के आहे. राज्यात प्रतिदिन चाचण्या जुलैत 37,528 इतक्या झाल्या, ती संख्या वाढून ऑगस्टमध्ये प्रतिदिन 64,801 इतकी झाली. ही वाढ 42 टक्के आहे. ऑगस्टचा संसर्ग दर महाराष्ट्रात 18.44 टक्के इतका होता. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.


'देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्र मागे आहे. भारताच्या सरासरीपेक्षा अधिक चाचण्या करणार्‍या राज्यात गोवा (1584), आंध्र (1391), दिल्ली (950), तामिळनाडू (847), आसाम (748), कर्नाटक (740), बिहार (650), तेलंगाणा (637), उत्तराखंड (590), हरयाणा (563) इतकी आहे. भारताची सरासरी 545 इतकी आहे.'


देशात संसर्ग दर देशाच्या तुलनेत कमी असणार्‍या राज्यांत सुद्धा महाराष्ट्र नाही. राजस्थान (4.18 टक्के), उत्तरप्रदेश (4.56 टक्के), पंजाब (4.69 टक्के), मध्यप्रदेश (4.74 टक्के), गुजरात (5.01 टक्के), बिहार (5.44 टक्के), हरियाणा (5.51 टक्के), ओरिसा (5.71 टक्के), झारखंड (6.19 टक्के), गोवा (8.05 टक्के), तामिळनाडू (8.10 टक्के), भारताचा 8.57 टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर 19.15 टक्के इतका आहे. असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. 


महात्मा जनारोग्य योजनेची प्रकरणे त्वरित निकाली काढणे, सातार्‍यात खाटांची क्षमता वाढवावी, सांगली आणि कोल्हापूर येथील संसर्ग दर, मृत्यूदर नियंत्रणात आणावे, रेमडेसिवीर हे औषध सर्वांना मोफत उपलब्ध करून देणे, अशा मागण्या देखील फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.