मार्ड संपाचा तिढा सोडवण्यात सरकारला अपयश, चौथ्या दिवशी संप सुरुच
निवासी डॉक्टरांची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबतची चर्चा फिसकटलीय. त्यामुळे, मार्डच्या संपाचा तिढा सोडवण्यात सरकारला अपयश आलंय.
मुंबई : निवासी डॉक्टरांची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबतची चर्चा फिसकटलीय. त्यामुळे, मार्डच्या संपाचा तिढा सोडवण्यात सरकारला अपयश आलंय. त्यामुळे सलग चौथ्या दिवशिही मार्डच्या डॉक्टरांचा संप सुरूच राहणार आहे. मात्र मार्डच्या ९० टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा गिरीश महाजनांनी केलाय. अलार्म बेल आणि वॉर्डमध्ये सुरक्षा रक्षक या मागण्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी लवकरच होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिलीय. त्यामुळे डॉक्टर आंदोलन मागे घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय.
मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका मार्डनं घेतलीय. मात्र, यामुळे मुंबईतल्या रुग्णांचे हाल कायम आहेत. जेजे रुग्णालयात शनिवारपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. शनिवारी एका महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण केली होती. त्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय. जेजेमधल्या डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सायनमधल्या डॉक्टरांनीही कामबंद आंदोलन सुरू केलंय. मार्डनं संप मागे घेणार नसल्याची भूमिका घेतल्यानं रुग्णांचेही हाल सुरू राहणार आहेत.