चर्चा सकारात्मक, पण पवार कुटुंबातला वाद मिटणार का?
पवार कुटुंबीयांमध्ये आतापर्यंत निर्माण झालेले वाद हे कुटुंबात चर्चा करूनच सोडवले गेले.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: पार्थ पवार यांची नाराजी दूर झाली की नाही हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी हे प्रकरण मिटवण्यासाठी पवार कुटुंबियांमध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार आज बारामतीला जाणार होते. मात्र, अजित पवारांशी त्यांची फोनवर सकारात्मक चर्चा झाल्याने पवारांनी बारामतीला जाणे रद्द केले आणि ते मुंबईला परतले.
पवार कुटुंबीयांमध्ये आतापर्यंत निर्माण झालेले वाद हे कुटुंबात चर्चा करूनच सोडवले गेले. विशेषतः अजित पवार यांच्याबाबत यापूर्वी दोनदा घडलेलं महाभारत पवार कुटुंबियांनी चर्चेने घरातच शांत केलं. शरद पवारांना ईडीची नोटीस आल्यानंतर अजित पवार अज्ञातस्थळी निघून गेले होते. राजकारण सोडण्याची भूमिका मांडणाऱ्या अजित पवारांची कुटुंबियांनी समजूत काढली आणि त्यांना पुन्हा राजकारणात सक्रीय केलं. त्यानंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेऊन जो धक्का दिला होता, तोही पवार कुटुंबियांनी घरातच निस्तरला. दोन्हीवेळा अजित पवार प्रकरण हे त्यांच्या कृतीमुळे घडलं होतं. पार्थ पवार यांच्या नाराजीला मात्र वेगळी किनार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सातत्याने डावलले जात असल्याची भावना पार्थ यांच्या मनात होतीच, त्यातच शरद पवारांनी जाहीरपणे केलेल्या वक्तव्याने ते चांगलेच दुखावले गेले.
गेल्या चार दिवस ही नाराजी कायम असल्याची चर्चा आहे. आजोबांचे शब्द जिव्हारी लागल्याने पार्थ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत होते. मात्र पवार कुटुंबियांनी त्यांच्याशी चर्चा सुरू केली. आत्या सुप्रिया सुळे, काका अभिजित पवार आणि श्रीनिवास पवार यांच्याशी पार्थ यांची चर्चा झाली. पार्थ आणि अजित पवार बारामतीत असल्याने पवारही बारामतीला निघाले, प्रतिभा पवारही त्यांच्यासोबत होत्या. बारामतीत शरद पवार, अजित पवार आणि श्रीनिवास पवार यांच्यात चर्चा होऊन हा विषय मिटवला जाईल अशी शक्यता होती. मात्र मध्येच पुण्यात थांबून शरद पवारांनी अजित पवारांशी फोनवर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे. त्यामुळेच शरद पवारांनी बारामतीला जाण्याचा बेत रद्द करून ते मुंबईत परतले. तरीही पार्थ पवार यांची नाराजी दूर झाली की नाही हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. जोपर्यंत याप्रकरणी पवार कुटुंबियांकडून अधिकृत प्रतिक्रिया येत नाही तोपर्यंत पार्थ पवार प्रकरणी संशयाचे ढग कायम राहणार आहेत.