शेतकऱ्यांनो, तुम्हाला मनापासून सलाम!
आजतागायत महाराष्ट्रात जे घडलं नाही, असं तुफान वादळ या महाराष्ट्रानं गेल्या दोन-चार दिवसांत अनुभवलं... इतिहासातला सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकला... पण मुंबईच्या गतीला, कायदा व्यवस्थेला जराही धक्का लागला नाही... सगळं काही शिस्तबद्ध... शांततेनं... म्हणूनच बळीराजा काही कौतुकाचे शब्द... तुझ्यासाठी...
स्नेहा अनकईकर, झी मीडिया, मुंबई : आजतागायत महाराष्ट्रात जे घडलं नाही, असं तुफान वादळ या महाराष्ट्रानं गेल्या दोन-चार दिवसांत अनुभवलं... इतिहासातला सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत धडकला... पण मुंबईच्या गतीला, कायदा व्यवस्थेला जराही धक्का लागला नाही... सगळं काही शिस्तबद्ध... शांततेनं... म्हणूनच बळीराजा काही कौतुकाचे शब्द... तुझ्यासाठी...
सलाम... शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मनापासून सलाम...
आमच्या पायाला साधं खरचटलं तरी आम्ही कुरकुरतो...
तुमच्या पायांच्या जखमा तर गेल्या कित्येक वर्षांच्या...
तशी तुमची अख्खी हयातच गेली शेतात...
पायाच्या भेगा आणि जखमांचं तुम्हाला कसलं आलंय कौतुक
असे किती काटे तुम्हाला बोचले असतील आणि पायातून वाहणारं रक्त मातीच चेपून थांबवलं असेल....
पण या मोर्चाच्या निमित्तानं तुमचे भेगाळलेले पाय आणि त्यातलं रक्त आम्हाला कदाचित पहिल्यांदाच दिसलं...
उन्हाळ्याच्या आधी आम्ही आठवणीनं सनस्क्रीन विकत आणतो... आमच्या मुलायम त्वचेसाठी... तुम्ही टळटळीत दुपारी माथ्यावरच्या सूर्याशी दोस्ती करत झपाझप कसारा घाट कापलात... त्या चटक्यांचंही तुम्हाला काय म्हणा... कारण आयुष्यभर शेतकरी म्हणून तुम्ही एवढे होरपळलायत... की त्यापुढे हे चटके कसले...
कधी तुम्हाला कांद्यानं रडवलं, कधी उसानं फसवलं... कधी तुमचं शेत लाल चिखलानं माखलं... कष्टं करुन, घाम गाळून, पोटाला चिमटे काढून तुम्ही पिकवलेलं हिरवंगार शेत सरकारच्या धरणासाठी, किंवा रस्त्यासाठी डोळ्यादेखत गेलं... पुनर्वसनासाठी सरकारी उंबरे झिजवताना अख्खी हयात संपली... ना मोबदला मिळाला... ना पुनर्वसन झालं... तुमच्या या सगळ्या त्याच त्याच कहाण्या आम्ही गेली कित्येक वर्षं ऐकतोय...
पोराबाळांना त्रास होऊ नये म्हणून...
आज पुन्हा या मागण्यांचं गाठोडं घेऊन तुम्ही मुंबई गाठलीत... नाशिक ते मुंबई दीड-दोनशे किलोमीटर पायपीट करत आलात... आली एकदाची मुंबई म्हणून थकली भागली एखादी माऊली जरा दोन-चार तास विसावली असती... एवढ्या मोठ्या सोमय्या मैदानात झालीच होती की तुमच्या रात्रीच्या निवाऱ्याची सोय... आल्यासरशी घोंगडं टाकून जरा दोन चार तास निजायचं होतं... पण तेही नाही... तांबडं फुटायच्या आतच आझाद मैदानाकडं चालू लागलात.
कारण, आमच्या मुंबईत दहावी-बारावीच्या पोरांच्या परीक्षा सुरू आहेत... उगाच तुमच्या मोर्चामुळे पोराबाळांचा रस्ता नको अडायला, त्यांचा पेपर नको चुकायला... तुमच्यासाठी बेस्टनं बसेस पण तयार ठेवल्या होत्या... पण एवढ्याशा पंधरा किलोमीटरसाठी कशाला बसेसचा थाटमाट म्हणत पायाला भिंगरी लागल्यागत आझाद मैदानात चालू पडलात...
आजवर अनेक आंदोलनांनी मुंबईकराला वेठीला धरलं... पण शेतकऱ्यांनो धग काय असते, ते तुम्ही पुरतं अनुभवलंय... म्हणूनच परीक्षेला जाणाऱ्या पोराबाळांना काय, पोलिसांना काय, मुंबईकरांना काय... कुणालाच तुम्ही दुखावलं नाहीत... सगळ्याच राजकीय पक्षांनी तुमचा कैवार घेत आपापली पोळी भाजून घेतली... तुम्ही ना कुणाला झिडकारलं... ना कुणाला दूर लोटलंत...शांततेचं, शिस्तीचं आणि सचोटीचं हे अभूतपूर्व लाल वादळ तमाम महाराष्ट्रानं अनुभवलं.
आजवर तुमच्या हाती काही पडलं नाही, हे सरकारसह सगळ्यांनाच मान्य आहे... आता या नव्या तोडग्यानंही हाती काय लागेल, याची शाश्वती नाही... पण शेतकरी राजा तू आम्हा सगळ्यांना जगवणारा कोट्यवधींचा पोशिंदा आहेस... तू जगला पाहिजेस... आणि सुखानं जगला पाहिजेस... आम्हाला जेवू घालणारा आमचा अन्नदाता पोटभरुन जेवला पाहिजेस... हीच सदिच्छा या अभूतपूर्व मोर्चाच्या निमित्तानं...