मुंबई :  केरळमध्ये वेळेवर दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. केरळमध्ये दोन दिवस मुक्काम केल्यानंतर मान्सून कारवारपर्यंत पुढे आला. पण पुढे कोकणात येण्यासाठी अनुकूल वातावरण कधी तयार होणार? याचं उत्तर हवामान विभागाने दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्सून कोकणात दाखल होण्यास अनुकूल वातावरण तयार होत असून पुढच्या दोन दिवसांत तो कोकणात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


निसर्ग चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर परिणाम होईल, असे हवामान खात्याने म्हटले होते. मान्सून स्थित होण्यास निसर्ग चक्रीवादळामुळे थोडा वेळ लागेल असा अंदाज होता. पण आता मान्सूनच्या कोकणातील आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे.


निसर्ग चक्रीवादळाआधी आणि नंतर कोकण आणि मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज होता. पावसाने त्यानुसार काही प्रमाणात जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर ओसरला.


कोकण आणि मुंबईत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तळकोकणात दोन दिवसांत पावसाचा जोर वाढत जाईल आणि दोन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.


मृग नक्षत्र सुरु झाल्याने आता सर्वांनाच मान्सूनची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा आठवडा मान्सूनच्या आगमनाचा आणि जोरदार पावसाचा असेल अशी अपेक्षा आहे.


 



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच क्षेत्रात पुनःश्च हरिओम करत काम सुरु झाल्यानंतर मान्सूनच्या आगमनामुळे शेतकरीही कामाला लागेल आणि खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात होईल. कोकणातल्या काही भागात भातपेरणीची कामे सुरु झाली आहेत. मान्सून सुरु झाला की शेतीच्या कामांना आणखी वेग येईल.