माव्यातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून कारवाई
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माव्यातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून कारवाईला सुरूवात झाली असून माव्याबरोबरच मिठाई, तेल,तुपाचे नमुने तपासले जातायत.
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माव्यातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून कारवाईला सुरूवात झाली असून माव्याबरोबरच मिठाई, तेल,तुपाचे नमुने तपासले जातायत.
गणेशोत्सव, दस-यापासून राज्यभरात फेस्टिव्हल ड्राईव्ह अंतर्गत ही कारवाई सुरू आहे. राज्यभरात विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये ११०० किलो भेसळयुक्त मावा जप्त करण्यात आलाय, ज्याची किंमत १ लाख ६१ हजार इतकी आहे. ७ टन इतकी भेसळयुक्त मिठाई जप्त केली असून त्याची किंमत सुमारे ८ लाख रूपये इतकी आहे.
तसंच २२ टन भेसळयुक्त तेल, तूपही जप्त केले असून ज्याची किंमत ४५ लाख इतकी आहे. ही कारवाई गणेशोत्सवापासून सुरू असली तरी भेसळयुक्त पदार्थ सापडण्याचे प्रमाण गेल्या १०-१२ दिवसांत सर्वाधिक आहे. कारण दिवाळीला सर्वाधिक मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांना अधिक मागणी असते.
भेसळयुक्त मावा, मिठाई कशी ओळखाल?
भेसळयुक्त मावा, मिठाई कशी ओळखावी, हा ग्राहकांना नेहमी पडणारा प्रश्न असतो. यासाठी एक सोपी पद्धत एफडीएच्या अधिका-यांनी सांगितली आहे. मावा म्हणजेच खव्याचे वजन वाढविण्यासाठी त्यामध्ये स्टार्चची भेसळ केली जाते. ही ओळखण्यासाठी घरच्या घरी वापरता येणारी एक पद्धत आहे. माव्यामध्ये थोडे पाणी टाकून तो थोडासा गरम करून त्यामध्ये आयोडीनचे काही थेंब टाकल्यास भेसळयुक्त मावा असल्याचा त्याचा रंग बदलून निळा होतो. हीच पद्धत आपण मिठाईच्या बाबतीतही वापरू शकतो. दिवाळीत मोठ्या प्रमाणात असे भेसळीचे प्रकार घडत असल्यानं सोप्या पद्धतीने ही माव्यातील भेसळ ओळखता येवू शकते.