मानखुर्दमध्ये फेरीवाल्यांचा पोलीस-आरोग्य कर्मचारी पथकावर हल्ला, दोघांना अटक
मानखुर्दमध्ये संचारबंदीच्या काळात रस्त्यांवर आलेल्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकारी आणि पोलिसांवर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना.
मुंबई : मानखुर्दमध्ये संचारबंदीच्या काळात रस्त्यांवर आलेल्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकारी आणि पोलिसांवर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या फेरीवाल्यांनी पोलिसांना आणि आरोग्य पथकातील पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी यासमिन शेख, नवाजुद्दीन सोफिया यांना अटक करण्यात आली आहे, तर अकबर शेख हा फरार झाला आहे.
या मारहाणीत शीतल माने व देवयानी कुटे या महिला पोलीस जखमी झाल्या. तसेच, फेरीवाला महिलांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही मारहाण केली. एकीकडे करोनाशी लढाईत पोलीसही आपले गदान देत आहेत तर अशा मुजोर फेरीवाल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होत आहे. पोलिसांवर हात उचलणाऱ्या या फेरीवाल्यांवर कोणाचा वरद हस्त आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तशी चर्चा सुरु झाली आहे.
मानखुर्दच्या येथील लल्लुभाई वसाहत येथे मुजोर फेरीवाल्यांची दादागिरी वाढत चाललेली दिसून येत आहे. पालिका आरोग्य अधिकारी आणि पोलिसांना मारहाण केल्याने येथे तणावाचे वातावरण होते. संपूर्ण देशात कोरोनाच्या पार्शवभूमीवर लॉकडाऊन आहे. गर्दी करु, नये असे आवाहन केले जात आहे. मात्र काही जण याचे गांर्भीय न घेता संचारबंदीचे उल्लंघन करताना दिसत आहेत. या उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिका तसेच पोलिसांचे पथक गेले होते. या पथकातील पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तसेच महिला पोलिसांनाच या मुजोर फेरीवाल्यांनी मारहाण केली.