मुंबई : मुंबई महापालिकेत आज पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पुन्हा एकदा भडकला आहे. जकात रद्द झाल्यावर त्याच्या भरपाईचा चेक देण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.यावेळी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध रंगलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांचं आगमन होताच भाजप नगरसेवकांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेकडूनही 'चोर है-चोर है'ची घोषणाबाजी करण्यात आली.


मुनंगटींवारांच्या भाषणाच्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनीही घोषणाबाजी केली. तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्यावेळी भाजप नगरसेवकांनी कार्यक्रमस्थळ सोडून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र वरीष्ठांनी त्यांना रोखलं.


मुनगंटीवारांनी 647 पॉईंट 34 कोटींचा चेक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पालिका आयुक्तांकडे दिला. जकात बंद झाल्यानं मुंबई महापालिकेला दरवर्षी सात हजार कोटींचं नुकसान अपेक्षित आहे. ते राज्य सरकारच्या तिजोरीतून दरमहा देण्यात येणार आहे. त्याचाच पहिला हप्ता यावेळी देण्यात आला.


याच कार्यक्रमात भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर व शिवसैनिकांची जोरदार झटापट झालीय. महापालिका मुख्यालय खालीच ही झटापट झालीय. उद्धव ठाकरेंनी महापालिकेत प्रवेश करत असताना नार्वेकर घोषणा देत होते. याआधी नार्वेकर अपक्ष नगरसेवक होते व शिवसेनेला पाठिंबा दिला होता. यंदा त्यांनी भाजपात प्रवेश केला निवडणूक लढवली. आणि विजयी झाले. नार्वेकर यांचे बंधू राहुलहेही आधी शिवसेनेत होते. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य आहेत.


दरम्यान महापालिकेचा कार्यक्रमात आणि त्यानंतर झालेल्या राड्याविषयी उद्धव ठाकरेंनी मौन बाळगलंय. भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांना झालेली धक्काबुक्की आणि घोषणा युद्ध याविषयी पत्रकार परिषदेत झी 24 तासनं विचारलेल्या प्रश्नाव उद्धव ठाकरेंनी बोलण्यास नकार दिला...झाल्याप्रकाराबद्दल माहिती नाही. योग्य ती माहिती घेऊन नंतर बोलेन असं उद्धव ठाकरेंनी म्हटलयं. महापालिकेतल्या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरेंच्या हस्ते तात्पुरत्या शिवालयाचं उद्घाटन करण्यात  आलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. 


उद्धव ठाकरेंसमोरच शिवसेना-भाजपमध्ये जोरदार घोषणाबाजी