मोबाइल चोरी करण्यासाठी फिल्मी स्टंट पडला महाग, उंचावरुन पडून आरोपीचा मृत्यू
दोन इमारतींच्यामध्ये शिडी लावून चोरीचा प्रयत्न
प्रशांत अंकुशराव, झी 24 तास, मुंबई : एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर जाण्यासाठी शिडी किंवा रस्सीचा वापर आपण सिनेमात पहिला असेल. पण मुंबईच्या चेंबूर भारत नगर भागात दोन चोरांनी मोबाईल चोरण्याकरिता दोन इमारतींच्यामध्ये चक्क शिडी टाकली आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण हा भलताच स्टंट त्यांना चांगलाच महागात पडला. मोबाइल चोरी करून परतताना दोन इमारतीत लावलेली शिडी तुटली आणि अल्पवयीन आरोपी 5 व्या माळ्यावरून खाली पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
असा आखला चोरीचा प्लान
मृत आरोपी आणि शाहबाज हे दोघंही रविवारी रात्री 2 च्या सुमारास न्यू भारतनगर बिल्डिंग नंबर 4 आणि 5 मध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. अगदी सिनेमात शोभेल असे स्टंट करत बिल्डिंग क्रमांक 4 मधून आरोपींनी बिल्डिंग क्रमांक 5 मध्ये रुम नंबर 503 च्या उघड्या खिडकीतून घरात प्रवेश केला. पण चोरी करून परतत असताना शिडी तुटली आणि एक जण खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या आरोपीला रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मृत आरोपीच्या साथीदाराला अटक
या घटनेची माहिती दुसऱ्या आरोपीनेच पोलिसांना दिली. पण माहिती देताना त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर खरी माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनीर मृत आरोपीचा साथीदार शाहबाज खान याला सदोष मनुष्य गुन्ह्यात अटक केली आहे.