मुंबई : राज ठाकरे यांनी दिलेला अल्टीमेटम संपल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेत फेरीवाले हटाव आंदोलन सुरू केले. या आंदोलनावरूनच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. कल्याणच्या एमएफसी आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण आणि डोंबिवली येथील मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि इतर २५ ते ३० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्यासह जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले आणि माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह ८ ते १० कार्यकर्त्यांवर गुन्हा करण्यात आला आहे.


मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी केलेल्या आंदोलनात फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली होती. तसेच रेल्वे स्थानक परिसरातील दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानाचीही नासधूस केली होती. घाटकोपर येथील मनसे कार्यकर्त्यांनी स्थानक परिसरातील सर्व फेरीवाल्यांचा विक्रीमालाची नासधुस करत रस्त्यावर फेकून दिला होता.  घाटकोपरच्या एम जी रोड, खोत लेन, श्रद्धानंद रोड वरील फेरीवल्याना हुसकावून लावले होते.


वसईतही मनसेच्या आंदोलनाचा फेरीवाल्यांना तडाखा बसला. वसईत रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना मनसेनं हुसकावून लावलं. यावेळी मनसे पदाधिकारी आणि फेरीवाले यांच्या मध्ये बाचाबाचीदेखील झाली. वसई विरार महापालिका केवळ  दिखाऊपणाची कारवाई करत असून महापालिका प्रशासनाच या फेरीवाल्यांना एक प्रकारे अभय देत असल्याचा आरोप मनसेनं या वेळी केला होता.