जमीन बळकावण्यासाठी आरेच्या जंगलाला आग, स्थानिकांचा आरोप
या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही
मुंबई : मुंबईत गोरेगाव पूर्व इथल्या जंगलात लागलेल्या आगीवर पाच तासांनंतर नियंत्रण मिळण्यात यश आलंय. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. गोरेगाव पूर्व इथल्या इन्सुलिटी आयटी पार्कच्या मागे जनरल अरुणकुमार वैद्य मार्गाजवळ जंगलात ही आग लागली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात येणाऱ्या या जंगलात आग लावून ही जमीन बळकावण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. आम्ही जंगलासाठी लढतोय... यासाठी आम्ही कायद्याचीही मदत घेतलीय, पण स्थानिकांचे हे प्रयत्न अशा पद्धतीनं हाणून पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप स्थानिकांनी केलाय.
दरम्यान, या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि वनविभाग यांनी संयुक्तरित्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
अधिक वाचा :- मुंबई पेटतेय.... गोरेगावच्या जंगलात अग्नितांडव
आजची आग लावली की लावण्यात आली, या विषयी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांनी दिलीय... तर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने देखील याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली. याबाबत विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं प्रभू यांनी सांगितलं.