मुंबई पेटतेय.... गोरेगावच्या जंगलात अग्नितांडव

आग लागलीच कशी?  उच्चस्तरीय चौकशी होणार   

ANI | Updated: Dec 4, 2018, 07:35 AM IST
मुंबई पेटतेय.... गोरेगावच्या जंगलात अग्नितांडव  title=

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील जंगलामध्ये सोमवारी सायंककाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, आणि त्यांनी प्रयकत्नांची पराकाष्ठा  केल्याचं पाहायला मिळालं, ज्यानंतर ही आग नियंत्रणात आली.

आरे कॉलनी परिसरातील इन्सुलिटी आयटी पार्क जवळ असणाऱ्या जनरल अरुणकुमार वैद्य मार्गाजवळ ही आग लागली होती. नागरीनिवारा परिषदेमागील डोंगरामध्ये असणाऱ्या जंगलाच्या भागात कोणीतरी जाणूनबुजून ही आग लावल्याचं म्हटलं जात आहे. 

अतिशय भीषण अशा या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. जवळपास तीन चे चार एकरच्या भूखंडावर आगीचा तांडव पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार खासगी मालकीच्या जागेत लागलेली आग ही जंगलापर्यंतही जाऊन पोहोचली. 

अद्यापही आग कशी लागली यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पण, तरीही बऱ्याच चर्चा आणि प्रश्नांनी मात्र डोकं वर काढलं आहे. याआधीही या विभागात अशाच पद्धतीचं अग्नितांडव पाहायला मिळालं होतं. त्यामुळे यावेळीही कोणीतरी जाणूनबुजून ही आग लावल्याचं कळत आहे. बिल्डर आणि विकासकांना हा भूखंड बळकावयाचा असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. 

मुंबईत घडलेल्या या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याची माहिती  सहाय्यक मनपा आयुक्त संजोग कबरे यांनी दिली. तर, केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना, सदर प्रकरणी करण्य़ात आलेल्या आरोपांत तथ्य असल्यास दोषींविरोधात कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे.