मुंबई :  घाटकोपर ते मानखुर्द लिंक रोडवर भंगार गोदामांना लागलेली आग तब्बल 20 तासांनंतर आटोक्यात आली आहे. या आगीत ५० ते ६० गोदामं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या गोदामांमध्ये तेल आणि केमिकल्स होती. तब्बल ४ ते ५ किलोमीटरवरून आगीचे धूर दिसत होते. फायरब्रिगेडच्या तब्बल 2 डझन गाड्यांनी अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग विझवताना फायर ब्रिगेडचा एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगीत या गोदामांमधील तब्बल ६०० पिंप फुटल्याचा अंदाज आहे. कित्येक गॅस सिलेंडर्सही आगीत फुटल्याची माहिती आहे. आग नियंत्रणात आली असली तरी सध्या कुलिंगचं काम इथे सुरू आहे. आग संपूर्णपणे नियंत्रणात येण्यास संध्याकाळपर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे. माफियांकडून ही आग लावली गेल्याचा अंदाज आहे. काही भूमाफिया जागा हडपण्यासाठी आगी लावत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.


शुक्रवारी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास एका गोदामाला आग लागली होती. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केलं.  बाजुलाच झोपडपट्टी असल्याने ही आग या ठिकाणी पसरण्याची भीती होती. पण अग्निशमनदलाने या आगीवर नियंत्रण मिळवलं.