जवानांनो सलाम! अग्निशमन दलाच्या जवानांनी हातानं विझवली `आरे`ची आग
आगीनं थोड्याच वेळात उग्र रुप धारण केलं आणि...
मुंबई : सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईतील आरे कॉलनी परिसरातील गोरेगाव पूर्व इथल्या जंगलात अचानक आग लागल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं... या आगीनं थोड्याच वेळात उग्र रुप धारण केलं... जवळच असलेल्या म्हाडा कॉलनीच्या रहिवासी भागाच्या अगदी जवळ ही आग दाखल झाली.... आरे कॉलनीच्या वणवा लागल्याच्या ठिकाणी, अग्निशामक वाहनं पोहचणं दुरापास्त होतं. त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचूनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मुंबईच्या अग्निशमनदलाच्या जवानांनी मग स्वतःच्या हातानं आग विझवण्याचं काम सुरू केलं...
जंगलातल्या हिरव्या झुडपाडांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांचे छोटे छोटे गट करून वणव्याच्या परिसरात पाठवण्यात आले. या गटांनी हिरव्या फांद्यांनी प्रहार करून आगीवर नियंत्रण मिळवलं.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
या आगीवर तब्बल पाच तासांनी नियंत्रण मिळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलंय. मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि वनविभाग यांनी संयुक्तरित्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. गोरेगाव पूर्व इथल्या इन्सुलिटी आयटी पार्कच्या मागे जनरल अरुणकुमार वैद्य मार्गाजवळ जंगलात ही आग लागली. दरम्यान, या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात येणाऱ्या या जंगलात आग लावून ही जमीन बळकावण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. आम्ही जंगलासाठी लढतोय... यासाठी आम्ही कायद्याचीही मदत घेतलीय, पण स्थानिकांचे हे प्रयत्न अशा पद्धतीनं हाणून पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप स्थानिकांनी केलाय.
आजची आग लावली की लावण्यात आली, या विषयी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांनी दिलीय... तर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने देखील याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली. याबाबत विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं प्रभू यांनी सांगितलं.