मुंबई : अंधेरीच्या कामगार रुग्णालयाला पुन्हा आग लागली आहे. रुग्णालयातील मीटर बॉक्सला ही आग लागल्याचं कळतं आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याआधी दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत ९ जणांचा बळी गेला होता. आज पुन्हा एकदा या रुग्णालयात आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत जवळपास १७५ लोकांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या आगीमुळे रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. अंधेरीच्या कामगार रुग्णालयात सोमवारी दुपारी लागलेली आग अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर अखेर नियंत्रणात आली खरी. पण, या आगीमुळे झालेली जीवित आणि वित्त हानी आता चिंतेची बाब ठरत आहे.


ही आग इतक्या भीषण स्वरुपाची होती की, परिस्थितीता घाबरत एका महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली होती. ज्यामध्ये त्यांना आपले प्राण गमवावे लागले. तर, दुसऱ्या एका रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यानंतर उपचारादरम्यान मृतांचा आकडा वाढतच गेला.


२००९ पासून संबंधित रुग्णालयाचं फायर ऑडिट करण्यात आलं नसल्याचं माहिती समोर आली होती.  तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या आगीचं, दुर्घटनेचं खापर एमआयडीसीवर फोडत शिवसेनेच्याच उद्योगमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यामुळे आता आगीचं राजकारणही अनेक वादांना वाव देत आहे हेसुद्धा नाकारता येणार नाही.