मुंबई : फटाके विक्रेत्यांना सरकार काही सवलत देणार का ? असा प्रश्न फायर कॅक्रर असोसिएशन सचिव राज नथानी यांनी राज्य सरकारला विचारलाय. फटाके फोडण्यावर बंदीला आमचा विरोध असून दिवाळीमध्ये फटाके विक्रीवर हजारो लोकांचे कुटुंब अवलंबून असल्याचे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे आधीच व्यवसाय ठप्प आहेत. शिवाय दिवसेंदिवस जनजागृती मुळे फटाके विक्री आधीच कमी झाली आहे. अनेकांनी कर्ज काढून व्यवसाय उभे केले आहेत ते पैसे कसे फेडणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.



पालिकेचे आदेश 


१४ नोव्हेंबर २०२० रोजी फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सोसायटीचे अंगण / घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी / झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी कोविड विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, शारीरिक दुरीकरण पाळणे व साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावयाची आहे. असं या परिपत्रकात म्हटले आहे.


मुंबईकरांसाठी यंदाची दिवाळी मात्र शांत शांत असणार आहे. दिवाळीत मुंबईत मोठ्या प्रमाणात फटाके फोडून दिवाळी साजरी केली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे दिवाळीवर देखील काही निर्बंध आले आहेत.


कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. याआधी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यंदा सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी घालण्यावर विचार सुरु असल्याचं म्हटलं होतं.