मुंबई: शिवसेनेचे विक्रोळीतील उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे विक्रोळीत मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारात शेखर जाधव गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर गोदरेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक माहितीनुसार, विक्रोळीच्या टागोरनगर परिसरात हा प्रकार घडला. एका व्यक्तीने शेखर जाधव यांच्यावर गोळीबार केला. गेल्या काही दिवसांपासून शेखर जाधव यांना धमक्या येत होते. गोळीबार झाला त्यावेळी शेखर जाधव यांचा मुलगाही त्यांच्यासोबत होता. यावेळी नागरिकांच्या सजगतेमुळे हल्लेखोराला पकडण्यात यश आले. पोलिसांकडून सध्या हल्लेखोराची कसून चौकशी सुरु आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेकडून माझ्या जीवाला धोका; किरीट सोमय्यांचा आरोप


शेखर जाधव आज पहाटे टागोरनगर परिसरातील मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन आपल्या कारमधून ते परतत असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात त्यांच्या खांद्याला गोळी लागली. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या जाधव यांना गोदरेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विक्रोळी हा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक आहे. त्यामुळे शेखर जाधव यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.



कालच नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले होते. विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता.