मुंबई : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेला महाराष्ट्रातील त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसकडून टीकेला सामोरे जावे लागले आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. थोरात यांनी ट्विट करून शिवसेनेच्या वैचारिक पक्षांतरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यांच्या या घोषणेने पक्षाच्या खासदार व नेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी मविआ आघाडीतील इतर पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये असंतोष वाढू लागला आहे.



महाराष्ट्र काँग्रेसचे दिग्गज बाळासाहेब थोरात यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी हा सततचा संघर्ष आहे. हा महिला विरुद्ध पुरुष किंवा आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी असा प्रश्न नाही.'


राष्ट्रवादीची भूमिका


महाविकासआघाडीतील आणखी एक मित्रपक्ष, राष्ट्रवादीने म्हटले आहे की, शिवसेनेने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असला तरी, राज्यात त्यांची युती कायम राहावी अशी त्यांची इच्छा आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, प्रत्येक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने स्वबळाची निवड केली आहे. हे एनडीएचे समर्थन नाही. मुर्मू हे आदिवासी समाजातून आहेत. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.