मुंबई : राज्यात डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी गेला आहे. डेल्टा प्लसचा बळी गेल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे या महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर तिला कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटची लागण झाली आणि त्यातच या महिलेचा बळी गेल्याची माहिती आहे.


मुंबईत बुधवारी एकाच दिवशी डेल्टा प्लस बाधित ७ रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आणखीन वाढली आहे. दरम्यान मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. मुंबईतील डेल्टा प्लसने झालेला हा पहिला मृत्यू असल्याचेही नमूद करण्यात आलं आहे. ही महिला पूर्व उपनगरात राहणारी होती. 


अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला मधुमेहासह अन्य आजारांमुळे गुंगागुंत वाढत जाऊन या महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत बुधवारी डेल्टा प्लसचे ७ रुग्ण आढळले होते. त्यात या महिलेचा समावेश होता. या महिलेने करोनावरील लसचे दोन्ही डोस घेतले होते. 


अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, या महिलेला कोरडा खोकला तसंच अंगदुखीचा त्रास होत होता. शिवाय चवही लागत नव्हती. त्यानंतर कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात महिलेवर उपचार सुरू होते. ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्यानंतर रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्स त्यांना देण्यात येत होतं. 


मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून डेल्टा प्लस विषाणूची लागण होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचे जीनोम सीक्वेन्सिंगमध्ये स्पष्ट झालं आहे. डेल्टा प्लसचा हा राज्यातील दुसरा मृत्यू ठरला आहे. जूनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये डेल्टा प्लसने महिलेचा मृत्यू झाला होता. 


राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 20 नवे रुग्ण बुधवारी आढळले. त्यामुळे डेल्टा प्लस बाधित एकूण रुग्णांची संख्या 65 वर पोहचली आहे.