मुंबई: राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवसांचा अवधी लागेल, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. आम्ही सरकार स्थापनेबाबत डेडलाईन ठरवलेली नाही. सध्या याबाबत केंद्रीय स्तरावरील नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. साधारण मंगळवार किंवा बुधवारच्या आसपास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत यावर साधकबाधक चर्चा करतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार स्थापन करताना तिन्ही पक्षांना कोणते मुद्दे मान्य होतील, याची चाचपणी आम्ही केली आहे. त्याचा अहवाल तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांना देण्यात आला आहे. तसेच महाशिवआघाडीत प्रथम मंत्र्यांची संख्या निश्चित होईल. यानंतरच खातेवाटपाची प्रक्रिया पार पडेल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.


मुंबई महापालिकेतही सत्तेची नवी राजकीय समीकरण जुळणार?


सत्तास्थापना घाईघाईत केल्यास पुढे जाऊन गोष्टी बिघडू शकतात. सरकार स्थापन न झाल्यास भाजपकडून आमदारांची फोडाफोडी होईल, अशी भीती राज्यातील जनतेला वाटते. त्यामुळे तिन्ही पक्ष लवकरात लवकर सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, पाच वर्षे सरकार टिकवायचे असल्याने सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.


शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असला तरी सरकार सेक्युलर पद्धतीने चालेल- पवार


काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत जाण्यात अडचण नाही. विकास आणि शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. भाजपच्या काळात अर्धवट राहिलेली विकासकामे आम्ही वेगाने पूर्ण करू, असे आश्वासनही यावेळी जयंत पाटील यांनी दिले. 


तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही शुक्रवारी राज्यात १७ नोव्हेंबरला सत्तास्थापना होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सत्तास्थापनेसाठी आणखी थोडा वेळ लागेल, असे त्यांनी सांगितले.