प्रथमेश तावडे,झी मीडिया,वसई : वसईतील एका लग्नसोहळ्याची चर्चा सध्या अनेकांपर्यंत पोहोचत आहे. लग्नसमारंभामध्ये घडल्या प्रकारानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामागचं कारणंही तसंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका लग्न समारंभात चित्रपटाला शोभेल असा प्रकार घडलेला पाहायला मिळाला. पतीच्या सुरू असलेल्या दुसऱ्या लग्नात पहिल्या पत्नीने धाड टाकत एकच राडा केला आणि लग्न अंतिम टप्प्यात सुरू असतानाच ते थांबवलं. 


वसई पूर्वेच्या वसंतनगरी परिसरातील जोशी पार्टी हॉल मध्ये हा प्रकार घडला. अर्जुन सिंग ठाकूर असं पतीचं नाव, तर कांचन सिंग ठाकूर असं पत्नीचं नाव आहे.


२०१२ मध्ये दोघांचा वैदिक पद्धतीनं विवाह झाला होता. लग्नावेळी पतीने हवा तो हुंडाही घेतला होता. पण, सहा महिन्यातच त्याने पत्नीला दूर केलं. अद्यापही या दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे.


घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोच त्यानं स्वत:च्याच दुसऱ्या लग्नाचा घाटही घातला. रविवारी पती दुसऱ्या लग्न करत असल्याचं पहिल्या पत्नीला समजलं आणि पुढे तिनं थेट लग्न मंडपात धाव घेतली. 


लग्नमंडपात पोहोचत तिनं एकच राडा केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. 


पहिली पत्नी लग्नमंडपात येत तिनं घातलेल्या या राड्यामुळे लग्न समारंभात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पत्नीने दाखवलेल्या या धाडसामुळे नवरदेवाच्या पहिल्या लग्नाचा भांडाफोड झाला आणि दुसरं लग्न होता होता थांबलं.


सुमारे दोन तास सुरू असलेल्या राड्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मध्यस्ती करत वातावरण शांत केलं. पतीने केलेल्या या कृत्याबाबत त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित पत्नीने केली आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडेच अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.