मुंबईत `या` पाच ठिकाणी बंड, सेनेच्या राजूल पटेल आक्रमक
मुंबईत पाच ठिकाणी महायुतीत बंडखोरी.
मुंबई : वांद्रे पूर्वमध्ये विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना शिवसेनेने पुन्हा संधी नाकारली. त्यांच्याऐवजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना तिकीट देण्यात आले आहे. तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वर्सोव्यामध्ये शिवसंग्रामच्या उमेदवार भारती लव्हेकर यांच्याविरोधात शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांनी अर्ज भरला आहे.
अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्याविरोधात भाजपाचे नगरसेवक मुरजी पटेल यांनी बंड पुकारले आहे. बोरिवलीत भाजपा उमेदवार सुनील राणे यांच्याविरोधात भाजपचे बोरिवली तालुकाध्यक्ष दीपक पाटणकर यांनी अर्ज भरला आहे.
शिवाजीनगर मानखुर्दमधून शिवसेनेच्या एबी फॉर्मवर विठ्ठल लोकरे यांनी अर्ज भरला तर ही जागा आरपीआयला सुटल्याने आरपीआयमधून गौतम सोनावणे यांनी अर्ज भरला आहे, परंतु त्यांना भाजपने एबी फॉर्म दिलेला नसल्याने ते अपक्ष उमेदवार ठरलेत.