मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पूल कोसळून दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला तर ३७ जण जखमी झाले आहेत. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅबच खाली कोसळल्याने ही दुर्घटना सायंकाळी घरी पतरणाऱ्या चाकरमान्यांवर मोठे संकट कोसळले. दरम्यान, या पुलाच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटरवरुन राजकारण रंगत आहे. रेल्वे प्रशासनाने हात झटकले असून मुंबई महापालिकेने रेल्वेकडे बोट दाखवले आहे. मात्र, सीएसएमटी पूल दुर्घटनेवरून काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई पालिका प्रशासन आणि सरकारवर जोरदार हलाबोल केला असून या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी केली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा पूल मुंबई पालिकेच्या अखत्यारितील असून सहा महिन्यांपूर्वीच या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते, अशी माहिती आहे. संबंधित ऑडिटरने हे पूल धोकादायक नसल्याचा अहवाल दिला होता. पुलाची किरकोळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचेही त्याने नमूद केले होते. असे असूनही हा पूल कोसळत असेल तर ही गंभीर बाब असून संबंधित ऑडिटर तसेच या ऑडिटरची नियुक्ती करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही खुनाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असे देवरा म्हणालेत. देवरा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ही मागणी केली. एल्फिन्स्टन, अंधेरी येथील पूल दुर्घटनांचा उल्लेख करत राज्य सरकार मुंबईकरांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही, अशी टीकाही देवरा यांनी केली.


मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर


ही गंभीर दुर्घटना. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू आहे. मृतकांच्या कुटुंबियांसोबत संवेदना आहेत. घटनेची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल. पूल १९८० ला बांधलेला आहे, याचे गेल्या वर्षी स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. त्यामध्ये काही सुधारणा सुचविले होते. मात्र हे पूल फिट सांगितले गेले होते. त्यामुळे असे असताना जर पूल कोसळत असेल तर ही गंभीर बाब आहे. हे बिलकुल सहन करण्यासारखे नाही. चौकशी केलीच जाईल सोबतच स्ट्रक्चरल ऑडिट बरोबर होते की नाही याची ही चौकशी केली जाईल. ते जर चुकीचे झाले असेल तर त्यांच्यावर ही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंत्र फडणवीस यांनी दिला. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ज्या सुधारणा सांगितल्या होत्या त्या झाल्या आहेत की नाही हे तपासले जाईल. गेल्या वर्षी मुंबई महापालिका आणि रेल्वे ने सर्व पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये मदत तर जखमींना ५० हजार रुपये मदत आणि त्यांचे उपचार मोफत केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



 दरम्यान, या दुर्घटनेमुळे मुंबई बाहेर जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. तसेच या ठिकाणचा सिग्नल पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सिग्नल पडल्यामुळे अनेक वाहने सिग्नलजवळ उभी होती. त्यामुळे दुर्घटना घडली. त्यावेळी वाहने पुढे गेली नाहीत, अन्यथा या ठिकाणी वेगळीच परिस्थिती पाहायला मिळाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


ही दुर्घटना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ रस्ता बंद केला. त्यामुळे मुंबईहून दादरच्या दिशेने जाणारी आणि मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या दुर्घटनेनंतर पुलाचा कोसळलेला ढिगारा बाजुला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे. आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सायंकाळी कामावरून सुटल्याने अनेक जण आणि मुंबई चाकरमानी हिमालया पुलावरून जात असताना अचानक हा पूल कोसळला. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅब खाली कोसळल्याने त्याबरोबर पुलावरून चालणारे चाकरमानीही खाली कोसळले. पूल कोसळल्यानंतर जोरदार आवाज आल्याने पळापळ झाली. या पुलाचा स्लॅब एका टॅक्सीवर कोसळल्याने या टॅक्सीचा चेंदामेदा झाला.