मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूल पडल्यानंतर स्वाभाविकपणे सुरू झाले ते आरोप प्रत्यारोप. हा पूल महापालिकेचा होता, असा आरोप रेल्वेने केला. तर हा पूल देखभालीसाठी महापालिकेकडे होता पण रेल्वेने ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही, त्यामुळे महापालिकेला या पुलाची देखभाल करता आली नाही, असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी केला.  मुंबईतल्या सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पूल कोसळून ५ जणांचा मृत्यू झालाय. तर ३६ जण जखमी झालेत. संध्याकाळच्या सुमारास या पुलावरून जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. पादचाऱ्यांची वर्दळ सुरू असतानाच हा पूल कोसळल्याचं सांगण्यात येतंय. मृतांमध्ये जी. टी. रुग्णालयाच्या दोन परिचारिका आणि अन्य एका महिलेचा समावेश आहे. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे अशी मृत परिचारिकांची नावं आहेत. तर भक्ती शिंदे असं अन्य महिलेचं नाव आहे. तपेंद्र सिंग जाहिद सिराज खान असं मृतांमधील इतर दोघांची नावं आहेत. दुर्घटना झाल्यानंतर जखमी आणि मृतांना तातडीनं सेंट जॉर्ज आणि जी.टी. हॉस्पिटलमध्य़े उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या दोन्ही रुग्णालय़ात सध्या ३६ जणांवर उपचार सुरू आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारत आणि अंजूमन इस्लाम शाळेजवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, पण पुलासाठी सरकारकडे पैसे नाहीत, लोकांच्या सुरक्षेचे काय, असा संतप्त सवाल आमदार वारिस पठाण यांनी विचारला आहे.



या घटनेनंतर रेल्वेच्या हद्दीतील पादचारी पुलांची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. यावरुन एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयावर टीका केली. आता या पुलावरुन एकमेकांवर खापर फोडण्याचा प्रकार होईल, बीएमसी आणि रेल्वेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतील, असे वारिस पठाण यांनी सांगितले. सरकारने या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.  



दरम्यान, मुंबईतील ताज्या रेल्वे दुर्घटनेनंतर काँग्रेसनं केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी काय ट्वीट केले आहे.