मुंबई : सध्या व्हीडिओ ब्लॉगिंगची क्रेझ आहे. परदेशी नागरिकही भारतात व्हीडिओ ब्लॉग करतात. परदेशी पर्यटकांचे व्हीडिओ ब्लॉग सोशल मीडियावर (Social Media) पहायला मिळतात. हे ब्लॉगर अनेक गोष्टींचा ब्लॉगमधून आढावा घेतात. हे ब्लॉगर्स व्हीडिओत लोकांशी स्थानिक भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्नही करतात. अशाच एका परदेशी ब्लॉगरने मराठीत संवाद साधला. मात्र त्याला मराठीतून प्रतिसाद देणारा एकही जण भेटला नाही. या लाजिरवाण्या व्हीडिओचा संपादित अंश 'मराठी बोला चळवळ' या फेसबूक पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. (foreigner video blogger speak marathi with vendors but anyone not give replied in marathi video viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेला व्हीडिओ अवघ्या 54 सेकंदांचा आहे. या व्हीडिओत हा परदेशी व्हीडिओ ब्लॉगर भाजीपाला खरेदी करतो. उल्लेखनीय बाब अशी की हा ब्लॉगर भाजी खरेदी करताना मराठीतून संवाद साधतोय. मात्र त्याला समोरुन फक्त नि फक्त हिंदीतूनच संवाद साधला गेला. 


व्हीडिओत नक्की काय?


"मी आज मराठीत संवाद साधून भाजीपाला विकत घेणार आहे. मी पहिल्यांदाच हे करत आहे. मी मराठी शिकत आहे. मी 2 महिन्यांपासून हे सतत करतोय", असं ही व्यक्ती या व्हीडिओत बोलतेय. त्यानंतर ही परदेशी व्यक्ती केळी आणि भाजी खरेदी करतो. 


"केळी कशी दिली? याला मराठीत काय म्हणतात? केला... केळ", असं हा परदेशी तरुण केळी विक्रेत्यासोबत संवाद साधतो. मात्र त्या विक्रेत्यालाही बनान्याला मराठीत काय म्हणतात हे माहित नसल्याचं समोर आलं. 


त्यानंतर हा तरुण भाजी घेण्यासाठी जातो. "20 रुपयांचे टॉमेटो आणि 20 रुपयांची मिर्ची द्या", अशी मागणी भाजी विक्रेत्याकडे करतो. याच वेळेस त्या गाडीवर मोबाईलमध्ये गाणं सुरु असतं. हे पाहून हा तरुण त्या विक्रेत्याला "हे कोणतं गाणं आहे?", असं विचारतो. यावर भोजपुरी साँग असल्याचं त्याला उत्तर मिळतं.


"मी काहीवेळा मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. मात्र समोरुन मला हिंदीत उत्तर मिळतं. त्यामुळे मी पण हिंदी बोलतो", असं या तरुणाने भाजीपाला खरेदी केल्यानंतर स्पष्ट केलं.


यानंतर हा तरुण आणखी भाजी खरेदी करण्यासाठी जातो. "एक कोबी द्या. याचं वजन किती आहे? एका भाजीकडे बोट दाखवून याला काय म्हणतात मराठीत?",  अशी चौकशी हा तरुण करतो. मात्र भाजीविक्रेत्याच्या हावभावावरुन या तरुणाला आपण विचारलेलं समजलं नसल्याचं लक्षात येतं.


त्यावर हा तरुण भाजीविक्रेत्याला "तुम्हाला मराठी येते का?" असं विचारतो. त्यावर मराठी नही आती, हिंदी आती है", असं उत्तर हा भाजीविक्रेता देतो. भाजीविक्रेत्याच्या या उत्तरामुळे या तरुणाचा अपेक्षाभंग झाला. 


"मला वाटायचं की इथे सर्वांना मराठी येते" असं उत्तर या तरुणाने भाजीव्रिकेत्याला दिलं. यावर "किसी को नही आती" असं संतापजनक उत्तर या भाजीविक्रेत्यानं दिलं.



यानंतर हा तरुण पुढे निघून जातो. या दरम्यान तरुण "मराठी बोलण्याच्या सरावासाठी हे योग्य ठिकाण नाही. इथले बहुतांश भाजीविक्रेते मराठी बोलत नाहीत. हे भाजीविक्रेत बहुतेक बिहार किंवा कुठले आहेत मला माहिती नाही", असं म्हणतो. 


हा व्हीडिओ मुंबई उपनगरातील नक्की कोणत्या भागातील आहे, हे समजू शकलेलं नाही. मात्र मुंबईत परदेशी तरुण मराठीत संवाद साधतो. मात्र त्याच्याशी मराठीत संवाद साधणारा एकही जण भेटला. त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.