कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : भाजपच्या माजी नगरसेवकाने केलेल्या बंडखोरीमुळे मुंबईतल्या अंधेरी पूर्व मतदारसंघात रंगतदार लढत पाहायला मिळत आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीने वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश शेट्टी या मतदारसंघातून सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, २०१४ मध्ये ते थेट तिसऱ्या स्थानी फेकले गेले. मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या रमेश लटकेंनी भाजपच्या सुनिल यादव यांना पराभूत करून शिवसेनेचा भगवा इथे फडकवला होता. आता युती झाल्यामुळे हे दोघेही एकत्र आले आहेत. 


तर दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना उमेदवार रमेश लटकेंची डोकेदुखी थोडी वाढली असल्याचे दिसते. असे असले तरी भाजपचे स्थानिक नेते मात्र शिवसेना उमेदवाराच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याने शिवसेनेची काही प्रमाणात चिंता मिटली.


शिवसेना उमेदवार रमेश लटके, भाजपचे बंडखोर मुरजी पटेल यांच्याबरोबरच काँग्रेसचे उमेदवार जगदिश अमिन हेदेखील रिंगणात आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने इथे तिरंगी लढत होत आहे. 


सुमारे पावणे तीन लाख मतदार असलेल्या अंधेरी पूर्वमध्ये सर्वाधिक १ लाख मतदार हे मराठी आहेत. त्यानंतर उत्तर भारतीय सुमारे ५५ हजार, मुस्लिम ३८ हजार, गुजराती/राजस्थानी ३५ हजार, दक्षिण भारतीय २० हजार आणि ख्रिश्चन १५ हजार आहेत. अशी संमिश्र लोकवस्ती असलेला अंधेरी पूर्वेचा मतदारसंघ यंदा कुणाच्या पाठिशी उभा राहतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.