प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : अनेक कलाकार, राजकारणी, खेळाडूंना प्राण्यांबद्दल विशेष प्रेम असते. अनेक सेलिब्रेटींचे प्राणी प्रेम माध्यमांपासून कधी लपून राहीले नाही. त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी आपल्या कुटुंबासहित 'तारा' नामक मादी बिबट्याचे पालकत्व स्वीकारले आहे. अभिनेता सुमीत राघवन याने याआधी 'तारा'ला दत्तक घेतले होते. त्याचा वर्षभराचा कालावधी नुकताच संपल्यानंतर संदीप पाटील यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान संदीप पाटील यांनी नुकतीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) वतीने 'वन्यप्राणी दत्तक योजने' अंतर्गत अनेक प्रसिद्ध चेहरे यात सहभागी झाले आहेत. 



एसजीएनपीच्या 'व्याघ्र-सिंह सफारी' आणि 'बिबट्या निवारा केंद्रा'तील प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी समाजातून अनेक हात पुढे आले आहेत. यासाठी ते एसजीएनपीमध्ये संबधित प्राण्याचा वर्षभराचा उदरनिर्वाह आणि वैद्यकीय शुल्क भरतात. संदीप पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी 'तारा'चे पालकत्व स्वीकारल्याची माहितीसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक / संचालक अन्वर अहमद यांनी दिली.



आज एसजीएनपीतील वनअधिकाऱ्यांसोबत त्यांनी पेट्रोलिंग केले. यावेळी त्यांनी प्राणीसंवर्धनासाठी आपल्या माध्यमातून आणखी काय करता येऊ शकते याविषयी वनअधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यामुळे येणाऱ्या काळात एसजीएनपीच्या वन्यजीव संरक्षणच्या मोहीमेत संदीप पाटील यांचा देखील सक्रीय सहभाग दिसू शकणार आहे.



माझ्या घरातील मंडळींनाही वन्यप्राण्यांची विशेष आवड आहे. ही आवड जोपासण्यासाठी आम्ही 'तारा'चे पालकत्व स्वीकारल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.


'तारा'लहानपणापासूनच माणसांच्या सानिध्यात असल्याने तिचा स्वभाव खेळकर आहे. तिच्या या स्वभावामुळे तिला पाहणारे आपसुकच तिच्या प्रेमात पडत असल्याचे राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यक अधिकारी डॉ. शैलेश पेठे सांगतात.