माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन
नीला सत्यनारायण यांचे आज कोविड-१९मुळे निधन झाले. त्यांच्यावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते.
मुंबई : राज्याच्या पहिला महिला निवडणूक आयुक्त आणि प्रसिद्ध लेखिका नीला सत्यनारायण यांचे आज कोविड-१९मुळे निधन झाले. त्यांच्यावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान सकाळी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. दरम्यान, नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच साहित्य-कला क्षेत्रातही कामगिरीची मोहोर उमटविणारे अनुभवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नीला सत्यनारायण यांना महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल असे मुख्यमंत्री म्हणाले. आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, मुंबईत मराठी कुटुंबात जन्मलेल्या नीला सत्यनारायण या महाराष्ट्रातील अनेक युवकांसमोर प्रशासकीय सेवेविषयीच्या प्रेरणास्थान होत्या. निवडणूक आयोगाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासारखी त्यांची इतरही अनेक कामे वैशिष्ट्यपूर्ण होती.
१९७२ च्या बॅचच्या सनदी अधिकारी असलेल्या नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. प्रशासकीय अधिकारी म्हणून ३७ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. गृहखाते, वनविभाग, माहिती व जनसंपर्क, समाजकल्याण, ग्रामविकास अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले होते.
नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक लोकप्रिय ठरले होते. उद्योजक व्यवसायाशी संबंधित त्यांनी लिहिलेले ‘सत्यकथा’ आणि वनविभागाच्या सचिव म्हणून आलेल्या अनुभवांवरील ‘एक दिवस (जी)वनातला’ हे पुस्तकही गाजले होते. त्यांनी अनेक स्तंभलेखन केले होते. कविता लेखन हा त्यांच्या आवडीचा विषय होता. सत्यनारायण यांच्या कथेवरुन 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केले होते.