बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेबाबत तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट
Balasaheb Thackeray Arrest : बाळासाहेब ठाकरे यांना करण्यात आलेल्या अटकेबाबत छगन भुजबळ यांनी अखेर मौन सोडलं.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक आमदारांनी बंड करत भाजपसह सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केल्यानंतर या बंडखोर आमदारांनी शिवसेनेसोबत फारकत का घेतली, याची आतापर्यंत अनेक कारणं सांगितली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करायला निघालेल्यांच्या मांडीला मांडी लावून कसं बसायचं, असंही एक कारण शिंदे गटाकडून दिलं जातंय. शिंदे गटाकडून देण्यात आलेल्या या कारणानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गौप्यस्फोट केलाय. बाळासाहेबांना अटक करण्यात आली तेव्हा भुजबळ उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदावर होते. (former home minister chagan bhujbal give clearfication about balasaheb thackeray arrest)
भुजबळ काय म्हणाले?
मी नुकताच 1999 मध्ये गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालो. बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातील सर्व फाईल बंद झाल्या होत्या. मात्र ही फाईल माझ्याकडे आली. कायद्यानुसार बाळासाहेबांवर केस दाखल करुन अटक केली पाहिजे, असं त्या फाईलमध्ये उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे मी द्विधा मनस्थितीत होतो.
मात्र पक्षानं शिवाजी पार्कच्या सभेत श्रीकृष्ण आयोगामध्ये ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करु असं आश्वासन दिलं होतं. आश्वासन पाळण्यासाठी मी फाईलवर सही केली. सही केल्यानंतर बाळासाहेबांना अटक होणार, अशी चर्चा सुरु झाली. जामीन मिळत असेल, तर तो त्यांना घेऊ द्या अशा शब्दात भुजबळ यांनी गौप्यस्फोट केला.