इंधन दरवाढ: सलग पंधराव्या दिवशीही ग्राहकांवरील बोजा कायम
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील दरही लवकरच कमी होण्यास सुरुवात होईल अशी आशा करायला हरकत नाही.
मुंबई : पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा सिलसिला आज सलग पंधराव्या दिवशीही सुरूच आहे. आज(सोमवार, २८ मे) देशभरात पेट्रोलच्या किंमती १५ पैसे तर, डिझेलच्या किंमती १२ पैसे वधारल्या आहेत. त्यामुळे मुंबईत एक लीटर पेट्रोलसाठी ८५ रुपये ०८ पैसे, एक लीटर डिझेलसाठी ७३ रुपये ६४ पैसे मोजावे लागत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या काळात १९ दिवस स्थिर राहिल्यावर १४ मे पासून इंधन दरवाढीला सुरुवात झाली. तेव्हापासून गेल्या पंधरा दिवसात पेट्रोलची किंमत लीटरमागे ३ रुपये ६४ पैसे तर, डिझेलची किंमत ३ रुपये २४ पैसे वाढली आहे.
दरवाढीने जनता हैराण
दरम्यान, दरवाढीनं जनता हैराण असली, तरी सरकार मात्र त्यावर काही ठोस पावलं उचलताना दिसत नाहीय. मंत्रिगट इंधन दरवाढीवर उपाय योजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलाय. हा मंत्रीगट लोकांचा मनस्ताप कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, इतकं उत्तर सध्या सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे.
जनतेचा आशावाद कायम
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील दरही लवकरच कमी होण्यास सुरुवात होईल अशी आशा करायला हरकत नाही.