सलग चौदाव्या दिवशी इंधनाचे दर चढेच!
वाढत्या इंधन दराचा फटका थेट बसत असल्यामुळे सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी पहायला मिळत आहे.
मुंबई: सलग चौदाव्या दिवशी इंधनाची दरवाढ सुरुच आहे. पेट्रोल १५ पैशांनी महागलंय तर डिझेलच्या दरात १७ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल ८५ रुपये ९३ पैसे तर, डिझेल ७३ रुपये ५३ पैसे लिटर एवढं महाग झालं आहे. मोदी सरकारचा चौथा वर्धापनदिन शनिवारी साजरा झाला. वाढत्या इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्यांमधील संतापाची भावना लक्षात घेऊन सरकार यावर काही तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, तसे काहीच घडताना दिसले नाही.
सरकारने तोडगा काढला नाही
दरम्यान, पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले होते. त्यातच शुक्रवारी रशियाने खनिज तेल उत्पादनाबद्दलच्या भूमिकेत थोडी नरमाई आणल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्चं तेल काहीसं स्वस्त झालं होतं. मात्र सरकारने कोणताही तोडगा काढला नसल्याने सलग चौदाव्या दिवशी इंधन दरवाढ झालीय. त्यामुळे महागाईच्या चटक्यापासून सर्वसामान्यांना सध्या तरी कोणता दिलासा मिळालेला नाही.
इंधन दरवाढीमुळे राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावतेही नाराज
वाढत्या इंधन दरवाढीविरोधात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेला त्रास होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एसटीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. एसटीचं जवळपास ५०० कोटींच्या वर नुकसान झालं असून भाडेवाढ अपरिहार्य़ असल्याचं त्यांनी सांगितलं. इंधन स्वस्त झाल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.
चढ्या इंधनदरामुळे जनतेत नाराजी
दरम्यान, वाढत्या इंधन दराचा फटका थेट बसत असल्यामुळे सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी पहायला मिळत आहे.